शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)
काय आहे सिडको
‘सिडको’ हे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित, या इंग्रजी नामाभिधानाचे संक्षिप्त रूप आहे. कंपनी म्हणून स्थापित झालेला हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या संपूर्ण मालकीचा एक सार्वजनिक उपक्रम आहे. १७ मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या या कंपनीला नवीन नगर विकास प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर विशेष विकास प्राधिकरणाचा दर्जा देवून शासनाने सिडकोवर अतिरिक्त जबाबदारी सोपविली व तिच्या कार्यकक्षा विस्तारल्या. नगर नियोजन आणि विकासातील देशातील एक अग्रगण्य संस्था असा लौकिक सिडकोने आजवरच्या कारकिर्दीत मिळवला आहे.
सिडकोची स्थापना
१७ मार्च १९७० रोजी सिडको अर्थात ‘शहर आणि औदद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित’ची (क्र. १४५७४, १९६९-७०) कंपनी कायदा १९५६ अन्वये स्थापना करण्यात आली. या मान्यतेची अधिसूचना राज्य सरकारचा ठराव (शा.नि.क्र. आयडीएल/५७७०/आयएनडी-१) अन्वये दुसऱ्याच दिवशी जारी करण्यात आली आणि सिडकोला नवीन नगर विकास प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला. ती उपकंपनी होती सिकॉम अर्थात महाराष्ट्र राज्य औदद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळची. सिकॉमकडून मिळालेल्या २७० लाख रुपयांच्या कर्जसहाय्यासह १९७० मध्ये सिडकोने १० लाख रुपयांच्या भरणा झालेल्या भांडवलावर कार्य सुरू केले. सिडकोने त्याच वर्षी सिकॉमकडून आणखी १६,६०,०६८.०५ रुपयांचे कर्ज घेतले.
२४ मार्च १९७० रोजी सिडकोचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. जे. बी. डिसूझा, वरिष्ठ भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी, यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. सिकॉमचे अध्यक्ष, तत्कालीन आयसीएस अधिकारी, श्री. एन. एम. वागळे यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
उद्दिष्ट्ये
महाराष्ट्र शासनाने सिडकोची 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नियुक्ती केली ती खालील उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता.
- मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणा-या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करणे.
- मुंबईच्या रस्ते वाहतूक, रेल्वे यंत्रणा या भौतिक सुविधांवरला ताण कमी करून करण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभारणे.
- विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील नागरिकांना सौख्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा आणि स्थैर्य देणाऱ्या बाबिंसोबतच उच्च जीवनमूल्यांनीयुक्त पायाभूत सोयी–सुविधा उपलब्ध करून देणे.
- राज्याच्या औदद्योगिक धोरणाला अनुसरून उदद्योगांचा समतोल विकास साधण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करून रोजगाराकरिता स्थलांतर करणा-या लोकांना व्यापार-उदिमासह रोजगार-स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे..
- सामाजिक एकात्मतेस पूरक व मनुष्यबळाच्या स्त्रोताला अधिक कार्यक्षमता देणारे चैतन्यदायी वातावरण उपलब्ध करणे.
- उच्च जीवनमुल्यांनी युक्त राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी आणि नव्या शहराच्या विविध स्तरांमध्ये निर्माण होणारी संभाव्य सामाजिक व आर्थिक विषमता दूर करून नव्या नागर जीवनात सामावून घेण्यासाठी, सार्वजनिक जीवनात महत्वाचे योगदान देण्यास सक्षम करण्यसाठी नियोजित प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना प्रशिक्षित करणे.
ध्येय
ही उद्दिष्टे म्हणजेच सिडकोचे धेय्य, जे आहे:
"सामाजिक आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांनी स्वयंपूर्ण अशा नागरी वसाहतीच्या निवासी, वाणिज्य, सामाजिक-सांस्कृतिक आणि औद्योगिक सद्यकालीन तसेच भविष्यातील गरजा पूर्ण करू शकेल असे नियोजनबद्ध शहर विकासित करणे."
भविष्यवेध
सिडकोच्या नियोजनकारांनी भविष्याचा वेध घेतला. एक मिशन निश्चित केले ते असे: 'दीर्घकाळ शाश्वत राहील असे एक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण शहर वसवायाचे; ज्यात असेल सामाजिक-आर्थिक विषमतारहित वातावरण जे परिपूर्ण अन् समृद्ध जीवनाला पूरक ठरेल.'