नगर रचना संचालनालय (DTP)
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
सन १९१४ ते १९६२ या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते. सन १९६२ पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले असून, संचालनालयाचे मुख्य कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे. संचालनालयातर्फे राज्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी जमीन वापर योजना बनविण्यात येतात. तसेच राज्यासाठी अचल मालमत्तेचे मूल्यनिर्धारण करणे, वार्षिक मूल्यदर तक्ते बनविणे इ. मूल्यनिर्धारण विषयक कामे करण्यात येतात.
विभागाचे ध्येय -
राज्याच्या नियोजित आणि संतुलित विकासासाठी तांत्रिक सहाय्य देणे आणि यंत्रणेचा प्रभावी वापर करून R.P/D.P/T.P योजनेच्या माध्यमातून विविध विकास प्रस्तावांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन देणे आणि उपाययोजना करणे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदींनुसार, नगर रचना संचालनायास व त्यांचे अधिपत्याखालील कार्यालयांना वैधानिक कामे पार पाडावी लागतात:
- प्रादेशिक योजना तयार करणे (प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत)
- नगरपरिषदा व आवश्यक तेथे बिगरनगरपरिषदांच्या विकास योजना तयार करणे.
- विकास योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी नगररचना योजना तयार करणे.
वरील वैधानिक कामांव्यतिरिक्त या विभागामार्फत नगर नियोजनाशी संबंधित खालील कामे करण्यात येतात:
- परिवहनविषयक नकाशे, शहराच्या वाहतूक व परिवहनविषयक समस्यांनुसार वाहतूक व्यवस्थापन नकाशे तयार करणे.
- शासकीय जमिनींचे भूमिअभिन्यास तयार करुन त्यांचे निर्गतीबाबत जिल्हाधिकारी यांना सल्ला देणे.
- जमिनीच्या विकास नियंत्रणाच्या संबंधाने नगरपरिषदा, महसूल व इतर विभागांना सल्ला देणे.
- जमीन मूल्यांकन व भूसंपादन कामात मूल्यांकन तज्ञ म्हणून काम करणे.
- जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकिलांना मूल्यांकनाबाबत सहाय्य करणे.
- नगरपरिषद हद्दीतील मिळकतींच्या करआकारणी कामी प्राधिकृत मूल्यांकन अधिकारी म्हणून काम करणे.
- मुद्रांक शुल्क वसुलीसाठी वार्षिक बाजार मूल्यदर तक्ते तयार करणे.
- सह जिल्हा निबंधक यांना मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८, कलम ३१, ३२, ३४ व ५३ खालील प्रकरणांमध्ये मूल्यांकनासाठी सहाय करणे.